यशोगाथा/ जळकेच्या शेतकऱ्यातर्फे डीजेच्या तालावर केळी बागेची पूजा करून केली कापणी
यशोगाथा/ जळकेच्या
जळगाव तालुक्यातील साधारणता दोन हजार लोकवस्तीचे जळके हे गाव असून येथे बरेच शेतकरी केळी चे उत्पादन घेतात. परंतु त्यात देखील उत्तम शेतीचा ध्यास घेऊन विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी कमी आहेत. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी 1999 पासून जळके येथील प्रशांत अशोक पाटील यांनी शेती करायला सुरुवात केली. त्यांचे शिक्षण बीए पदवी पर्यंत झाले होते. परंतु नोकरीच्या मागे न लागता आपले वडिलोपार्जित 50 एकर शेती असल्यामुळे त्यांनी शेतीला प्राधान्य दिले. त्यातच 2006 मध्ये वडील अशोक त्र्यंबक पाटील वारल्यानंतर त्यांनी राजकारण किंवा इतर कोणत्याही व्यसनांच्या नादी न लागता मनापासून अभ्यासपूर्वक शेती करायला सुरुवात केली.
त्यांना यावर्षी गावाजवळील दहा एकर शेतात मागील वर्षी फेब्रुवारीला लागवड केलेल्या जैन इरिगेशनच्या टिशू कल्चर ग्रँड नाईन व्हरायटी पासून 2100 ते 2200 क्विंटल इतके केळीचे विक्रमी उत्पन्न मिळाले. याला जवळपास सरासरी 2800 ते 3000 रुपये इतका चांगला भाव मिळाला. जामनेर येथील इंडिया फ्रुट कंपनीच्या अमीन पटेल यांनी हा माल खरेदी केला व बॉक्स पॅकिंग मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवला. चांगला भाव व विक्रमी उत्पादन मिळाल्यानंतर त्यांनी डीजे लावून पहिले केळीची गाडी रवाना केली.
त्याचप्रमाणे सध्या त्यांचा चार एकरात पिलबाग आहे तर चार एकरातील नवती केळी लागवड एप्रिल मध्ये कापणीस येईल.
केळी मध्ये टरबूज हे आंतरपीक घेण्याचा त्यांचा मागील पाच ते सहा वर्षांपासून चा प्रयोग यावर्षी देखील यशस्वी झाला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सात एकर क्षेत्रात त्यांनी कलश कंपनीचे प्रचंड जातीचे टरबूज लागवड केले. त्यांना टरबूज मध्ये देखील जिल्ह्यात सर्वाधिक 210 टन उत्पन्न अवघ्या सात एकरात मिळाले. सरासरी एकरी 20 ते 22 टन टरबुजा पासून शेतकऱ्याला उत्पादन मिळते परंतु नियोजनबद्ध शेतीमुळे त्यांना एकरी 30 टन इतके रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न टरबुजात मिळाले. त्यांचे टरबुजाचे एक्सपोर्ट अगोदर दिल्ली, पंजाबला व्हायचे परंतु या वेळेस मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळे मुंबईहून दुबई येथे त्यांचा टरबूज एक्सपोर्ट झाला. फळांची साईज अडीच ते सात किलो पर्यंत होती, भाव देखील दहा रुपये अकरा पैसे इतका त्यांना मिळाला. टाकळी येथील व्यापारी भगवान राजपूत यांनी हा माल दुबई येथे एक्सपोर्ट केला.
टरबूज उत्पादन वाढीसाठी त्यांनी सेंद्रिय खते, शेणखत तसेच वॉटर सोल्यूबल यारा कंपनीचे खतांचा मुबलक वापर केला तसेच वेळोवेळी फवारणी कडे लक्ष दिले.
त्यांनी 19 एकरात कपाशीचे पूर्व हंगामी 300 क्विंटल तर फरदड 100 क्विंटल असे एकूण 400 क्विंटल उत्पन्न घेतले. तसेच सात एकर क्षेत्रात मका देखील 225 क्विंटल घेतला.
पाणीपुरवठ्यासाठी त्यांच्याकडे चार विहिरी एक कुपनलिका तसेच दीड एकर म्हणजेच 2400 स्क्वेअर मीटरचे शेततळे आहे. मागील वर्षे वर्षी मंजूर झालेले साडेसात एचपी चे सोलर पॅनल देखील त्यांच्याकडे आहे.आपल्या वडिलोपार्जित शेतीत वाढ करत त्यांनी मागील वर्षी बांधाला लागून सात एकर शेती देखील विकत घेतली.
त्यांच्या कुटुंबात आई, लहान भाऊ श्रीकांत पुणे येथे विप्रो कंपनीत इंजिनियर आहे. तीन विवाहित बहिणी पुणे येथेच स्थायिक आहेत. मुलगा आयुष् देखील पुण्यालाच बहिणीकडे शिकतो. तर मुलगी युतीका व पत्नी स्वाती हे जळगावला मुलीच्या शिक्षणासाठी राहतात. शेतीतूनच त्यांनी जळगाव येथे महाबळ एरियात प्रशस्त असा बंगला बांधलेला आहे. त्यांचे चुलत भाऊ राजू भैय्या म्हणजेच चंद्रकांत गणपत पाटील हे नुकतेच जळके गावाचे लोकनियुक्त सरपंच झालेले आहेत.
शांत विनायशील नम्र स्वभावातूनअहोरात्र मेहनतीच्या जोरावर नोकरी पेक्षा कितीतरी पटीने शेतीमध्ये उत्पादन घेता येते. एखाद्या पिकाला एखाद्या वर्षी भाव सापडला तर किती विक्रमी उत्पादन मिळेल हे सांगता येत नाही हेच जळके येथील शेतकरी प्रशांत अशोक पाटील यांच्या उदाहरणातून दिसून येते.